शब्दांच्या जाती (भाग १) - विकारी शब्द(parts of speech 1)

Sunil Sagare
0

 


आपण जेव्हा बोलतो किंवा लिहितो, तेव्हा अनेक शब्द एकत्र वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतो. वाक्यातील प्रत्येक शब्दाचे एक विशिष्ट कार्य असते आणि त्या कार्यानुसार त्या शब्दाची जात ठरते. मराठी व्याकरणात शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. 

या आठ जातींचे दोन मुख्य गटांमध्ये विभाजन होते:

  1. विकारी शब्द (सव्यय): ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदल होतो, त्यांना 'विकारी' म्हणतात. (उदा. मुलगा-मुलगी-मुलगे-मुलांना).

  2. अविकारी शब्द (अव्यय): ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल होत नाही, ते 'अविकारी' शब्द होत.

या लेखात, आपण पहिल्या गटातील म्हणजेच 'विकारी' शब्दांच्या चार जातींचा (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद) सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे चारही प्रकार वाक्याचा मुख्य सांगाडा तयार करतात.


१. नाम (Noun)

व्याख्या: सृष्टीतील कोणत्याही प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला, व्यक्तीला, जागेला, गुणाला किंवा भावनेला दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, 'नाव' म्हणजेच 'नाम'.

उदाहरणे:

  • व्यक्ती: राम, सीता, सचिन, कबीर.

  • वस्तू: टेबल, खुर्ची, पेन, पुस्तक.

  • ठिकाण: पुणे, मुंबई, भारत, हिमालय, शाळा.

  • नदी: गंगा, यमुना, गोदावरी.

  • गुण/भावना: आनंद, दुःख, सौंदर्य, प्रामाणिकपणा, राग.

  • समूह: सैन्य, वर्ग, कळप, समिती.

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत, जे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

अ) सामान्यनाम (Common Noun)

  • व्याख्या: एकाच जातीच्या किंवा गटातील सर्व वस्तूंना किंवा व्यक्तींना त्यांच्यातील सारखेपणामुळे जे एकच नाव दिले जाते, त्याला 'सामान्यनाम' म्हणतात.

  • वैशिष्ट्ये:

    • हे नाव संपूर्ण जातीचा किंवा गटाचा बोध करते.

    • हे विशिष्ट एका व्यक्तीचे, वस्तूचे किंवा जागेचे नाव नसते.

    • सामान्यनामाचे अनेकवचन होते. (उदा. नदी-नद्या, शहर-शहरे).

  • उदाहरणे:

    • नदी: हे नाव कोणत्याही नदीला लागू होते (गंगा, यमुना, कृष्णा). 'नदी' हा शब्द त्या संपूर्ण जातीचा बोध करतो.

    • मुलगा: हा शब्द कोणत्याही मुलासाठी वापरला जातो (राम, समीर, आकाश).

    • शहर: हे नाव कोणत्याही शहराला लागू पडते (नागपूर, कोल्हापूर, दिल्ली).

    • इतर उदाहरणे: पर्वत, देश, ग्रह, फूल, फळ, प्राणी, घर, शाळा, शिक्षक, पुस्तक, भाषा.

ब) विशेषनाम (Proper Noun)

  • व्याख्या: ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्याचा किंवा ठिकाणाचा बोध होतो, त्यास 'विशेषनाम' म्हणतात.

  • वैशिष्ट्ये:

    • हे 'खास' नाव असते, जे त्या जातीतील एका घटकाला ओळखण्यासाठी ठेवलेले असते.

    • विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते.

    • सामान्यतः विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. (उदा. 'राम'चे अनेकवचन 'राम' असेच राहते, 'राम'चे 'रामे' होत नाही. मात्र, 'या वर्गात तीन पाटील आहेत' अशा वाक्यात जेव्हा एकाच नावाची अनेक मुले असतात, तेव्हा अनेकवचन होऊ शकते).

  • उदाहरणे:

    • गंगा: हे एका विशिष्ट नदीचे नाव आहे.

    • राम: हे एका विशिष्ट मुलाचे नाव आहे.

    • पुणे: हे एका विशिष्ट शहराचे नाव आहे.

    • इतर उदाहरणे: हिमालय (पर्वत), भारत (देश), सूर्य (तारा), सचिन (खेळाडू), महाराष्ट्र (राज्य), मराठी (भाषा).

सामान्यनाम आणि विशेषनाम यांतील फरक:

सामान्यनामविशेषनामस्पष्टीकरण
नदीगोदावरी, कृष्णा, नर्मदा'नदी' हे सामान्य नाव, पण 'गोदावरी' हे एका विशिष्ट नदीचे खास नाव.
मुलगाअशोक, राहुल, कबीर'मुलगा' हे कोणालाही लागू होते, पण 'अशोक' हे एका विशिष्ट मुलाला दिलेले नाव.
पर्वतसह्याद्री, हिमालय, सातपुडा'पर्वत' हे सामान्य नाम, पण 'हिमालय' हे एका विशिष्ट पर्वताचे नाव.
देशभारत, अमेरिका, जपान'देश' या शब्दात सर्व देश येतात, पण 'भारत' म्हटल्यावर एका विशिष्ट देशाचा बोध होतो.

क) भाववाचक नाम (Abstract Noun)

  • व्याख्या: ज्या नामाने वस्तू किंवा प्राण्यांमधील गुण, धर्म किंवा भाव (भावना) यांचा बोध होतो, त्याला 'भाववाचक नाम' म्हणतात.

  • वैशिष्ट्ये:

    • भाववाचक नामाने दर्शवलेले गुण किंवा भावना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो.

    • हे नाव वस्तू किंवा व्यक्तीच्या स्थितीचा किंवा क्रियेचा बोध करते.

    • सामान्यपणे भाववाचक नामांना य, त्व, पण, पणा, की, ई, आई, वा यांसारखे प्रत्यय लागलेले असतात.

  • उदाहरणे:

    • सौंदर्य: (सुंदर या विशेषणापासून)

    • प्रामाणिकपणा: (प्रामाणिक या विशेषणापासून)

    • श्रीमंती: (श्रीमंत या विशेषणापासून)

    • माधुर्य: (मधुर या विशेषणापासून)

    • शौर्य: (शूर या विशेषणापासून)

    • बालपण/बाल्य: (बालक या नामापासून)

    • मनुष्यत्व: (मनुष्य या नामापासून)

    • चपळाई: (चपळ या विशेषणापासून)

    • नवलाई : (नवल या शब्दापासून)

    • शांतता: (शांत या विशेषणापासून)

    • आनंद, दुःख, प्रेम, राग, भीती: या मूळ भावना दर्शवणाऱ्या शब्दांचाही यात समावेश होतो.


२. सर्वनाम (Pronoun)

व्याख्या: वाक्यात नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी, नामाच्या ऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' म्हणतात. सर्वनामामुळे भाषेला सौंदर्य आणि ओघ प्राप्त होतो.

उदाहरण:

  • चुकीचे वाक्य (सर्वनामाशिवाय): श्रीकांत सकाळी लवकर उठतो. श्रीकांत अभ्यास करतो. श्रीकांत  मित्रांना श्रीकांत  मदत करतो.

  • बरोबर वाक्य (सर्वनामासह): श्रीकांत  सकाळी लवकर उठतो. तो अभ्यास करतो. आपल्या मित्रांना तो  मदत करतो.

    • येथे 'श्रीकांत' या नामाऐवजी 'तो' आणि 'आपल्या' हे शब्द वापरले आहेत. म्हणून, ते सर्वनाम आहेत.

मराठीत एकूण नऊ मूळ सर्वनामे आहेत: मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. या नऊ सर्वनामांपासून लिंग आणि वचनानुसार इतर सर्वनामे तयार होतात. (उदा. तो-ती-ते-त्या, मी-आम्ही, तू-तुम्ही).

सर्वनामाचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

अ) पुरुषवाचक सर्वनाम (Personal Pronoun)

  • व्याख्या: बोलणाऱ्याच्या, ज्याच्याशी बोलायचे त्याच्या किंवा ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीच्या नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला 'पुरुषवाचक सर्वनाम' म्हणतात.

  • याचे तीन उपप्रकार आहेत:

    1. प्रथम पुरुषवाचक (First Person): बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरते.

      • उदाहरणे: मी, आम्ही, आपण (स्वतःसाठी).

      • वाक्य: मी शाळेत जातो. आम्ही क्रिकेट खेळतो.

    2. द्वितीय पुरुषवाचक (Second Person): बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी बोलताना जी सर्वनामे वापरते.

      • उदाहरणे: तू, तुम्ही, आपण (समोरच्यासाठी).

      • वाक्य: तू काय करतोस? तुम्ही आत या.

    3. तृतीय पुरुषवाचक (Third Person): बोलणारी व्यक्ती तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूविषयी बोलताना जी सर्वनामे वापरते.

      • उदाहरणे: तो, ती, ते, त्या.

      • वाक्य: तो खूप हुशार आहे. ते माझे घर आहे.

ब) दर्शक सर्वनाम (Demonstrative Pronoun)

  • व्याख्या: जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते, त्याला 'दर्शक सर्वनाम' म्हणतात.

  • उदाहरणे: हा, ही, हे (जवळची वस्तू/व्यक्ती दाखवण्यासाठी), तो, ती, ते (दूरची वस्तू/व्यक्ती दाखवण्यासाठी).

  • वाक्य:

    • हा माझा भाऊ आहे.

    • ही माझी शाळा आहे.

    • ते फूल सुंदर आहे.

    • तो किल्ला बघा.

क) संबंधी सर्वनाम (Relative Pronoun)

  • व्याख्या: वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला 'संबंधी सर्वनाम' म्हणतात. ही सर्वनामे मिश्र वाक्यात येतात.

  • उदाहरणे: जो, जी, जे, ज्या.

  • महत्त्वाची टीप: संबंधी सर्वनामाच्या वाक्यात बहुधा पुढे दर्शक सर्वनाम (तो, ती, ते) येतेच.

  • वाक्य:

    • जो अभ्यास करेल, तो पास होईल. (जो-तो)

    • जे चकाकते, ते सोने नसते. (जे-ते)

    • ज्याने हे काम केले, तो पुढे या. (ज्याने-तो)

ड) प्रश्नार्थक सर्वनाम (Interrogative Pronoun)

  • व्याख्या: ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्याला 'प्रश्नार्थक सर्वनाम' म्हणतात.

  • उदाहरणे: कोण (व्यक्तीसाठी), काय (वस्तूसाठी), कोणाला, कोणी, कशाने.

  • वाक्य:

    • तुमच्यापैकी पुढे कोण येणार?

    • तुम्हाला काय हवे आहे?

    • ही वही कोणी फाडली?

इ) अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम (Indefinite Pronoun)

  • व्याख्या: 'कोण', 'काय' ही सर्वनामे जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना 'अनिश्चित सर्वनाम' म्हणतात.

  • वाक्य:

    • कोणी यावे आणि टिकली मारून जावे. (येथे 'कोणी' म्हणजे कोण हे निश्चित नाही).

    • त्याच्या पिशवीत काय होते ते समजले नाही. (येथे प्रश्न विचारलेला नाही, तर वस्तू निश्चित नाही).

    • कोणाला काही अडचण असेल तर सांगा.


३. विशेषण (Adjective)

व्याख्या: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे नामाचे गुण, संख्या, क्रम किंवा वैशिष्ट्य दर्शवते.

उदाहरण: शूर मुलगा, पाच टोप्या, काळा कुत्रा.

या उदाहरणांमध्ये 'शूर', 'पाच' आणि 'काळा' हे शब्द अनुक्रमे 'मुलगा', 'टोप्या' आणि 'कुत्रा' या नामांबद्दल अधिक माहिती देतात, म्हणून ती विशेषणे आहेत.

विशेषणाचे मुख्य प्रकार:

अ) गुणवाचक विशेषण (Adjective of Quality)

  • व्याख्या: जे विशेषण नामाचा रंग, रूप, आकार, चव, किंवा कोणताही गुण दर्शवते, त्याला 'गुणवाचक विशेषण' म्हणतात.

  • उदाहरणे:

    • रंग: पांढरा ससा, हिरवे रान.

    • रूप/आकार: सुंदर फूल, उंच इमारत.

    • चव: आंबट कैरी, गोड लाडू.

    • गुण: हुशार विद्यार्थीप्रामाणिक नोकर, कडू कारले.

ब) संख्यावाचक विशेषण (Numeral Adjective)

  • व्याख्या: ज्या विशेषणातून नामाची संख्या किंवा क्रम दर्शवला जातो, त्याला 'संख्यावाचक विशेषण' म्हणतात.

  • याचे काही महत्त्वाचे उपप्रकार आहेत:

    1. गणनावाचक (Cardinal): वस्तूंची मोजणी किंवा गणना दर्शवते.

      • उदा: दहा मुले, पन्नास रुपये, एक तास.

    2. क्रमवाचक (Ordinal): वस्तूंचा किंवा व्यक्तींचा रांगेतील क्रम दर्शवते.

      • उदा: हिला क्रमांक, दहावी इयत्ता, तिसरा मजला.

    3. आवृत्तीवाचक (Frequency): एखादी क्रिया किती वेळा घडली हे दर्शवते.

      • उदा: दुप्पट पैसे, तिहेरी रंग, चौपट अंतर.

    4. पृथकत्ववाचक (Distributive): संख्या वेगळी करून किंवा गट करून दर्शवते.

      • उदा: केक मुलगा, दहा-दहाचा गट.

    5. अनिश्चित (Indefinite): निश्चित संख्या किंवा प्रमाण सांगता येत नाही.

      • उदा: काही मुले, सर्व रस्ते, थोडी साखर, अनेक प्रश्न.

क) सार्वनामिक विशेषण (Pronominal Adjective)

  • व्याख्या: जेव्हा एखादे सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते, म्हणजेच विशेषणाचे कार्य करते, तेव्हा त्याला 'सार्वनामिक विशेषण' म्हणतात.

  • महत्त्वाची टीप: सर्वनाम जेव्हा एकटे येते, तेव्हा ते सर्वनाम असते. पण जेव्हा ते नामासोबत येते, तेव्हा ते सार्वनामिक विशेषण बनते.

  • फरक समजून घ्या:

    • हा हुशार आहे. (येथे 'हा' एकट्याने आले आहे, म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे).

    • हा मुलगा हुशार आहे. (येथे 'हा' शब्द 'मुलगा' या नामापूर्वी येऊन त्याबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो सार्वनामिक विशेषण आहे).

  • इतर उदाहरणे:

    • माझे घर

    • तुझी शाळा

    • कोणता पक्षी?

    • असल्या गोष्टी


४. क्रियापद (Verb)

व्याख्या: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या आणि वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला 'क्रियापद' म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द असते. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही.

उदाहरणे: पक्षी उडतो., ती अभ्यास करते., आम्ही जेवण केले.

या वाक्यांमध्ये 'उडतो', 'करते', 'केले' हे शब्द क्रिया दाखवतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

क्रियापदाचे मुख्य प्रकार:

अ) सकर्मक क्रियापद (Transitive Verb)

  • व्याख्या: ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची (Object) गरज लागते, त्याला 'सकर्मक क्रियापद' म्हणतात. म्हणजेच, क्रिया फक्त कर्त्यापुरती (Subject) मर्यादित न राहता ती कर्मावर घडते.

  • कर्म कसे ओळखावे?: क्रियापदाला 'काय?' किंवा 'कोणाला?' ने प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते, ते कर्म असते. जर उत्तर मिळत असेल तर क्रियापद सकर्मक असते.

  • उदाहरणे:

    1. गाय दूध देते.

      • कर्ता: गाय

      • प्रश्न: काय देते? उत्तर: दूध (कर्म)

      • म्हणून, 'देते' हे सकर्मक क्रियापद आहे.

    2. शिक्षक मुलांना शिकवतात.

      • कर्ता: शिक्षक

      • प्रश्न: कोणाला शिकवतात? उत्तर: मुलांना (कर्म)

      • म्हणून, 'शिकवतात' हे सकर्मक क्रियापद आहे.

ब) अकर्मक क्रियापद (Intransitive Verb)

  • व्याख्या: ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, त्याला 'अकर्मक क्रियापद' म्हणतात. क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते.

  • 'काय?' किंवा 'कोणाला?' ने प्रश्न विचारल्यास उत्तर मिळत नाही.

  • उदाहरणे:

    1. तो हसतो.

      • कर्ता: तो

      • प्रश्न: काय हसतो? / कोणाला हसतो? (उत्तर मिळत नाही).

      • म्हणून, 'हसतो' हे अकर्मक क्रियापद आहे.

    2. पक्षी आकाशात उडतो.

      • कर्ता: पक्षी

      • प्रश्न: काय उडतो? / कोणाला उडतो? (उत्तर मिळत नाही. 'कुठे उडतो?' याचे उत्तर 'आकाशात' आहे, पण ते कर्म नाही).

      • म्हणून, 'उडतो' हे अकर्मक क्रियापद आहे.

क) संयुक्त क्रियापद (Compound Verb)

  • व्याख्या: जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला (धातुसाधित) दुसऱ्या एखाद्या सहाय्यक क्रियापदाची (सहाय्यक क्रियापद) मदत घ्यावी लागते, तेव्हा त्या दोन्ही शब्दांच्या मिळून बनलेल्या क्रियापदाला 'संयुक्त क्रियापद' म्हणतात.

  • रचना: धातुसाधित + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद

  • उदाहरणे:

    1. बाळ खेळू लागले.

      • 'खेळू' (धातुसाधित) + 'लागले' (सहाय्यक क्रियापद) = खेळू लागले (संयुक्त क्रियापद).

      • फक्त 'बाळ खेळू' किंवा 'बाळ लागले' याने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.

    2. तो खाऊन मोकळा झाला.

      • 'खाऊन' (धातुसाधित) + 'झाला' (सहाय्यक क्रियापद) = खाऊन झाला (संयुक्त क्रियापद).

ड) सहाय्यक क्रियापद (Auxiliary Verb)

  • व्याख्या: जे क्रियापद मुख्य क्रियावाचक शब्दाला (धातुसाधिताला) जोडून येते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करते, त्याला 'सहाय्यक क्रियापद' म्हणतात.

  • उदाहरणे: आहे, होता, असेल, लागणे, देणे, शकणे, पाहणे, नये, नको इत्यादी.

  • वाक्य:

    • मी अभ्यास करत आहे. ('आहे' हे सहाय्यक क्रियापद)

    • तो पळू शकतो. ('शकतो' हे सहाय्यक क्रियापद)

    • त्याला जाऊ दे. ('दे' हे सहाय्यक क्रियापद)




मराठी :शब्दांच्या जाती (भाग १) विकारी शब्द - सराव चाचणी

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    टिप्पणी पोस्ट करा (0)

    #buttons=(Accept !) #days=(20)

    Our website uses cookies to enhance your experience. Learn More
    Accept !
    To Top