नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांनी एक विधान केले जे ऐकून कोणत्याही पालकाची झोप उडू शकते. मस्क म्हणाले, "आता असे दिवस येत आहेत की AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे बहुतेक डॉक्टरांपेक्षा जास्त अचूकपणे रोगाचे निदान करू शकेल. भविष्यात डॉक्टर होण्यासाठी वर्षानुवर्षे शिक्षण घेणे कदाचित वेळेचा अपव्यय ठरेल."
हे फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही. आयटी (IT) क्षेत्रात तर मोठी उलथापालथ झाली आहे. 'Claude Cowork' नावाच्या एका नवीन सॉफ्टवेअरने काय केले माहीत आहे? जिथे chatGPT, Cursor सारखे चॅटबॉट आणि AI एजंट्स फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि कोडिंग करायची. त्याच ठिकाणी 'Claude Cowork’ने एकाच वेळी शेकडो इंजिनिअर्स, कायदेविषयक सल्लागार, अकाउंटंट, कर्मचारी व्यवस्थापक(एच आर) आणि प्रकल्प व्यवस्थापक यांचे काम स्वतः करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, पूर्वी ज्या प्रोजेक्टसाठी १० माणसांची गरज लागायची, तिथे आता १ माणूस आणि हे एआय पुरेसे आहे. अमेरिकन कंपन्यांना आता काम भारतासारख्या देशात (Infosys, TCS यांसारख्या कंपन्यांकडे)पाठवण्यापेक्षा एआय प्लगइन्स वापरणे स्वस्त आणि सोपे वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत, जे ९ लोक तंत्रज्ञानासोबत स्वतःला बदलणार नाहीत, त्यांच्या भविष्याचे काय? हा प्रश्न आता खूप गंभीर झाला आहे.
वैद्यकीय क्षेत्र आणि इंजिनिअरिंगपुढील वास्तविक धोका
एलन मस्क म्हणतात त्याप्रमाणे, AI आता केवळ डेटा प्रोसेस करत नाही, तर ते रोबोट्सच्या मदतीने शस्त्रक्रिया (Surgeries) करण्यासाठी सज्ज होत आहे.. 'Optimus' सारखे रोबोट्स येत्या ३-५ वर्षात मानवी सर्जनपेक्षा जास्त अचूकपणे काम करू लागतील. मग लाखो रुपये खर्च करून १०-१२ वर्षे जे शिक्षण मुले घेतात, त्याची किंमत काय उरेल?.
आयटी क्षेत्राची अवस्था तर अधिक गंभीर आहे. 'Claude Cowork' सारखे टूल्स आता केवळ असिस्टंट राहिले नाहीत, तर ते 'को-वर्कर' बनले आहेत. ते स्वतः विचार करू शकतात, चुका सुधारू शकतात आणि प्रोजेक्ट पूर्ण करू शकतात.. याचा अर्थ असा की, एंट्री-लेव्हल जॉब्स (जसे की टेस्टिंग, बेसिक कोडिंग) पूर्णपणे नष्ट होतील.
'इनोव्हेटर्स डिलेमा' : चहावाला आणि IIT इंजिनिअर
तुम्ही कधी विचार केला आहे का, की आज एखाद्या मोठ्या आयटी इंजिनिअरपेक्षा एखादा चहा विकणारा किंवा 'वडापाव वाला' जास्त पैसे का कमावतोय? किंवा एखादा कमी शिकलेला मुलगा यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कसे काय मिळवतोय?
प्रसिद्ध लेखक युव्हल नोआ हरारी (Yuval Noah Harari) त्यांच्या पुस्तकात एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, "भविष्यात माणसांची अडचण ही नाही की त्यांना काम मिळणार नाही, तर खरी अडचण ही असेल की त्यांच्याकडे जे ज्ञान आहे, त्याची जगाला गरजच उरणार नाही."
सध्याची शिक्षण व्यवस्था ही ज्ञान आधारित(Knowledge based) आहे. ‘ज्ञान(Knowledge)’ जो यशाचा राजमार्ग समाजाला जायचा, त्याची आजच्या जगाला मुळीच गरज नाही. कारण आज ज्ञान इंटरनेट वरच्या एका क्लिक वर किंवा माहिती , चॅट जीपीटी वरील टाकलेल्या एका प्रॉम्प्ट वर सहज उपलब्ध होते.
आपल्या समाजात एक मोठी 'ब्लाइंडफोल्ड' (डोळ्यावर पट्टी) आहे. पालकांना वाटते की मुलाला एकदा मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला की त्याचे आयुष्य सुरक्षित झाले. पण इथेच आपण 'इनोव्हेटर्स डिलेमा' (Innovator’s Dilemma) मध्ये अडकतो.
Clayton Christensen यांच्या या सिद्धांतानुसार, ज्या संस्था किंवा व्यक्ती आपल्या जुन्या यशात खूप यशस्वी असतात (जसे की IITians किंवा MNC कंपन्या), त्या नवीन बदलांना स्वीकारायला सर्वात जास्त वेळ लावतात. कारण त्यांना वाटते की त्यांची 'जुनी पद्धत' आजही चालेल. पण आज AI दर तीन महिन्यांनी स्वतःला अपडेट करत आहे. ३-४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तंत्रज्ञान इतके पुढे गेलेले असते की, हातातली पदवी फक्त कागदाचा तुकडा असेल.
आज परिस्थिती अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीतील 'नवख्या इंजिनिअर' (Novice Engineer) पेक्षा एखादा चहा टपरीवाला किंवा वडापाव विक्रेता जास्त कमाई करत आहे. याचे कारण काय? कारण त्यांनी 'गरज' ओळखली आहे आणि ते 'रिअल-वर्ल्ड स्किल्स' वर काम करत आहेत, पदवीवर नाही.
माहितीचा महापूर आणि आटलेली शिकण्याची जिद्द
तंत्रज्ञानाने सुबत्ता, सुरक्षितता तसेच ज्ञान व माहिती मिळवण्याची सहजता आणली. त्याचबरोबर काही समस्याही निर्माण झाल्या.
प्रत्येक पालकाची आज एकच तक्रार आहे - "माझा मुलगा हुशार आहे, त्याला अभ्यासाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, पण त्याची शिकण्याची इच्छा का नाही?"
असे का घडतेय? याचे उत्तर पुस्तकात नाही, तर त्यांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये आणि मेंदूच्या विज्ञानात दडलेले आहे.
'इन्स्टंट' यशाचा सापळा: पूर्वी एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी कष्ट करावे लागायचे, वाचनालयात जावे लागायचे, अनेक पुस्तके वाचावी लागायची. या प्रक्रियेत एक प्रकारची 'ओढ' असायची. पण आज? गुगल आणि चॅटजीपीटीमुळे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एका सेकंदात मिळते. २ मिनिटांच्या रीलमधून जगाचे ज्ञान मिळाल्याचा आभास होतो. मुलगा गृहपाठ किंवा स्वातंत्र्य दिनाचे भाषण सर्व काही गुगलवर मिळवतो. आणि पालकांनाही अशा ऑनलाईन कॉपी केलेल्या गृहपाठाचे, भाषणाचे / नृत्याचे कौतुक वाटते. पण अशी कमी मेहनतीने, आयती मिळालेली माहिती व ज्ञान अल्पकालीन ठरते. याशिवाय वास्तविक आयुष्यातील जीवघेण्या स्पर्धेत याचा मुलाला काही फायदा होईल का? याचाही विचार पालकांनी करायला हवा.
जेव्हा कष्ट न करता मेंदूला माहिती किंवा करमणूक मिळते, तेव्हा मेंदूत 'डोपामाइन' (Dopamine) नावाचे रसायन स्रवते. हे रसायन 'तात्पुरता आनंद' देते खरे, पण 'कष्ट करण्याची जिद्द' संपवून टाकते...
'गरजेचा नियम' (Law of Need) संपलाय का? शिक्षणाचे तीन महत्त्वाचे नियम आहेत, त्यापैकी सर्वात मुख्य म्हणजे 'गरज'. जेव्हा मुलाला सर्व काही 'आयते' (Ready-made) मिळते, तेव्हा त्याच्या मेंदूला काही नवीन शिकण्याची 'गरज'च भासत नाही. ज्याला आपण 'आळस' म्हणतो, तो प्रत्यक्षात आळस नसून 'संतुष्टतेचा अतिरेक' आहे. सुरक्षितता आणि सोयी-सुविधांच्या अतिरेकामुळे मुलांमधील 'आंतरिक प्रेरणा (Inner Motivation)' म्हणजेच स्वतःहून काहीतरी करण्याची ऊर्मी नष्ट होत आहे.
मुलांच्या शिक्षणाची नवी दिशा : कौशल्याचे शिक्षण
१. संघर्ष, आत्मनिर्भरता आणि आंतरिक प्रेरणा (Inner Motivation): जर तुम्हाला वाटते की तुमच्या मुलाने AI च्या युगात टिकून राहावे, तर त्याला पुन्हा एकदा 'कष्टाची' आणि 'संघर्षाची' ओळख करून द्यावी लागेल. घरातली छोटी कामे करणे, स्वतःचे ताट धुणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाट पाहणे— यातून 'आत्मनिर्भरता' येते. जेव्हा मूल स्वतःच्या कष्टाने एखादे छोटे यश मिळवते, तेव्हा त्यातून मिळणारे समाधान हे रील बघून मिळणाऱ्या समाधानापेक्षा कैक पटीने मोठे असते. आणि कष्टातून मिळालेल्या यशाचे हेच समाधान त्याची अधिक कष्ट करण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी लागणारी आंतरिक प्रेरणा आणखी मजबूत करते.
२. इमोशनल इंटेलिजन्स (EQ): जीवनातील यशासाठी बुद्ध्यांक (IQ) पेक्षा भावनिक बुद्ध्यांक (EQ) जास्त महत्त्वाचा असतो. हा केवळ भविष्यातील 'डिमांड' असलेला स्किल नाही, तर तो मानवी यशाचा नेहमीच एक मुख्य आधार राहिला आहे. शालेय जीवनात अभ्यासात मागे असलेल्या पण खऱ्या आयुष्यात प्रचंड यश मिळवलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला आढळतील. यामागे खरे रहस्य अशा यशस्वी व्यक्तींची उच्च भावनिक बुद्धिमत्ता (EQ)हेच आहे.
एआय कडे प्रचंड माहिती आणि तर्क असू शकतो, पण त्याच्याकडे 'सहानुभूती' (Empathy) नसते. आपल्या मुलाला स्वतःच्या भावना ओळखायला शिकवणे, संकटाच्या वेळी स्वतःला सावरणे आणि समोरच्याच्या मनातले न बोललेले भाव वाचायला शिकवणे, हे त्याला कोणत्याही यंत्रापेक्षा जास्त सामर्थ्यवान बनवेल. ज्या मुलाचा EQ भक्कम असतो, तो केवळ तांत्रिक कामातच नव्हे, तर मानवी नाती जपण्यात आणि मोठे नेतृत्व करण्यातही यशस्वी होतो, कारण त्याला माणसांची मने जोडण्याची कला अवगत असते.
३. प्रभावी संवाद (Communication Skills): संवाद म्हणजे केवळ अस्खलित इंग्रजी बोलणे नव्हे, तर आपले विचार समोरच्याच्या मनापर्यंत आत्मविश्वासाने पोहोचवण्याची ती एक कला आहे. आजच्या माहितीच्या युगात समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे (Active Listening), योग्य देहबोलीचा (Body Language) वापर करणे आणि शब्दांपलीकडले भाव समजून घेणे, हे सर्वात मोठे कौशल्य ठरेल. एआय केवळ माहितीपूर्ण उत्तरे देऊ शकेल, पण कठीण प्रसंगात टीमचे मनोबल वाढवणे, एखाद्याला मनापासून प्रेरित करणे किंवा शब्दांच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणे हे फक्त मानवी संवादामुळेच शक्य आहे. हे कौशल्य मुलांना केवळ हुशार बनवणार नाही, तर त्यांना समाजाचे एक प्रभावशाली आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून घडवेल.
४. डिजिटल साक्षरता आणि एआयचा वापर: मुलांना एआयपासून लांब ठेवणे म्हणजे त्यांना भविष्यातील संधींपासून वंचित ठेवण्यासारखे आहे; त्याऐवजी त्यांना एआयचा वापर आपला 'सेवक' आणि एक 'जीनियस सहाय्यक' म्हणून कसा करायचा, हे शिकवणे काळाची गरज आहे. मुलांना हे उमजले पाहिजे की एआय हे त्यांना 'काढून टाकणारे' तंत्रज्ञान नसून, त्यांच्या कल्पकतेला आणि बुद्धीला धार देणारे एक शक्तिशाली शस्त्र आहे. जो मुलगा तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादकता आणि कल्पकता अधिक वेगाने वाढवू शकेल, तोच उद्याच्या जगात प्रगती करेल. तंत्रज्ञान हे आपल्या नैसर्गिक बुद्धीला पर्याय नसून ते बुद्धीची व्याप्ती वाढवणारे एक आधुनिक साधन आहे, ही जाणीव त्यांना तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनवेल.
५. क्रिटिकल थिंकिंग आणि समस्या निवारण (Problem Solving): आज माहिती तर एका क्लिकवर सगळीकडे उपलब्ध आहे, पण त्या माहितीचा वापर करून प्रत्यक्ष आयुष्यातील खरी समस्या कशी सोडवायची (Problem Solving), हे सर्वात महत्त्वाचे जीवनकौशल्य असेल. मुलांमध्ये 'क्रिटिकल थिंकिंग' विकसित करणे म्हणजे त्यांना माहितीची शहानिशा करायला लावणे, त्या माहितीचे सकारात्मक व नकारात्मक पैलू विचारात घेऊन त्या माहितीची वैधता, उपयुक्तता व मूल्य निश्चित करणे आणि अडचणीच्या वेळी चौकटीबाहेरचा विचार करून स्वतःचा मार्ग शोधायला प्रवृत्त करणे होय. जेव्हा एखादी अडचण येईल, तेव्हा ती स्वतःहून सोडवून न देता, मुलाला "यावर अजून काय उपाय असू शकतो?" असा प्रश्न विचारा. यामुळे मुलाची तर्कशक्ती वाढते आणि प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याची वृत्ती त्याला भविष्यातील कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रसंगात खंबीरपणे उभे राहण्यास मदत करेल.
६. वेलनेस, कृतज्ञता आणि सजगता (Mindfulness): माहितीच्या या वेगवान प्रवाहामुळे आणि सततच्या स्पर्धेमुळे आजची मुले कमालीच्या मानसिक ताणाखाली आहेत. त्यांना या ओझ्याखाली दबण्यापासून वाचवण्यासाठी 'मानसिक आरोग्य' जपायला शिकवणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मुलांना रोजच्या जगण्यातल्या छोट्या गोष्टींबद्दल 'कृतज्ञता' (Gratitude) व्यक्त करायला शिकवा, ज्यामुळे त्यांच्यात नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक राहण्याची शक्ती निर्माण होईल. तसेच, 'सजगता' (Mindfulness) किंवा ध्यानाच्या माध्यमातून वर्तमानात जगायला शिकवल्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल आणि मन स्थिर राहील. ज्या मुलाचे मन शांत आणि शरीर निरोगी असते, तोच जगातील वेगाने होणाऱ्या बदलांशी अधिक सक्षमपणे जुळवून घेऊ शकतो. खंबीर मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांती हीच एआय युगातील त्यांची खरी संपत्ती ठरेल.
७. आजीवन शिकण्याची वृत्ती (Lifelong Learning): "पदवी घेतली की शिक्षण संपले," ही मानसिकता कालबाह्य होत आहे. कारण दर ३-४ महिन्याला नवीन तंत्रज्ञान जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेत आहे, ते पाहता ‘सतत नवीन शिकणे’ आणि ‘गतीने शिकणे’ ही आता एक जीवनशैली बनली पाहिजे. मुलांमध्ये नवीन कौशल्ये (Skills) शिकण्याची आणि स्वतःला काळानुसार बदलण्याची 'लवचिकता' (Flexibility) निर्माण करणे आवश्यक आहे. स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि 'शिकत राहणे' ही वृत्ती त्यांना आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर अप्रासंगिक (Irrelevant) होऊ देणार नाही. ज्या मुलाला 'कसे शिकायचे' (Learn how to learn) हे समजले आहे, तो आयुष्यातील कोणत्याही वळणावर यशाची नवी शिखरे सहज पादाक्रांत करेल.
लक्षात ठेवा: ज्या मुलाला 'कसे शिकायचे' (Learn how to learn) हे उमजले आहे आणि ज्याच्याकडे स्वतःची 'आंतरिक प्रेरणा' शाबूत आहे, त्याला भविष्यात कोणत्याही मंदीची किंवा AI ची भीती बाळगण्याचे कारण नाही.
तुमच्या मुलाला फक्त 'IITian' किंवा 'Doctor' बनवण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा, त्याला एक असा माणूस बनवा जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा मार्ग शोधू शकेल. कारण भविष्यात पदवी नाही, तर 'शिकण्याची जिद्द' आणि 'बदलण्याची तयारी' हाच खरा 'पासपोर्ट' असेल.
टीप: हा लेख वैयक्तिक संशोधनावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या ट्रेंड्सवर आधारित आहे. वाचकांना अंतर्मुख करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.